ब्रेकिंग
केजमधील घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत उलगडा…..!

केज दि. ३० – पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या ४८ तासांच्या आत एका आरोपीला जेरबंद केले आहे. या कारवाईत आरोपीकडून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रकरणाचा समांतर तपास बीड स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. दिनांक २९ जुलै २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांचे पथक केज हद्दीत आरोपीचा शोध घेत होते. तपास करत असताना, हा गुन्हा फुलेनगर (ता. केज, जि. बीड) येथे राहणाऱ्या ऋषिकेश दिलीप काळे याने केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी ऋषिकेश दिलीप काळे याला फुलेनगर येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरी केलेली रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने घरातच ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर दोन पंचांसमक्ष पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम आणि ७४,०००/- रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अंबेजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पो.उप.नि. महेश विघ्ने, पोलीस हवालदार बप्पासाहेब घोडके, दिलीप गित्ते, महेश जोगदंड, जफर पठाण आणि चालक गणेश मराडे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.