
केज दि. ३० – केज शहरातील बहुतांश भागासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या सोनीजवळा रोडवरील स्मशानभूमी सध्या स्वतःच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या स्मशानभूमीची झालेली अतिशय दयनीय अवस्था, सर्वत्र वाढलेले गवत आणि मूलभूत सुविधांचा पूर्णपणे असलेला अभाव यामुळे परिसरातील नागरिकांना दुःखाच्या प्रसंगी अंत्यसंस्कार करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सध्या या स्मशानभूमीच्या परिसरात सर्वत्र मोठे गवत आणि काटेरी झुडपे वाढली असून नागरिकांना बसण्यासाठी साधी आसन व्यवस्था अथवा निवाराही उपलब्ध नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या विजेच्या किंवा प्रकाशाची सोय नाही, तसेच पाण्याचीही प्रचंड टंचाई आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी या परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असता, रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना अक्षरशः बाहेरून जनरेटर भाड्याने आणून त्याच्या प्रकाशात अंत्यविधी उरकावा लागला. दुःखाच्या प्रसंगीही नागरिकांना अशा प्रकारे मनस्ताप सहन करावा लागत असल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सदरील गंभीर समस्येबाबत परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाकडे दाद मागत आहेत. स्मशानभूमीची योग्य प्रकारे डागडुजी व्हावी, त्या ठिकाणी लाईट आणि पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी, तसेच अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या लोकांना थांबण्यासाठी योग्य ती सोय करण्यात यावी, अशी रास्त मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाने या संवेदनशील प्रश्नाकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली असून अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे नागरिकांमध्ये मोठे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासनाने त्वरित या स्मशानभूमीचे डागडुजी करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी केज शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.