ब्रेकिंग
विलास घुले हत्या प्रकरणाला गंभीर वळण…..!

बीड दि. १४ – केज तालुक्यातील विलास घुले या तरुणाच्या हत्येप्रकरणातील उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी बीड येथे गेल्या १० दिवसांपासून विलास घुले यांच्या कुटुंबीयांचे उपोषण सुरू आहे. मात्र, १० दिवस उलटूनही प्रशासनाकडून या मागणीची योग्य दखल न घेतल्याने, आज अखेर उपोषणस्थळी बंदोबस्तासाठी हजर असलेल्या पोलिसांसमोरच स्वर्गीय विलास घुले यांच्या पत्नीने विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना घडली.
या घटनेनंतर उपोषणस्थळी मोठी पळापळ उडाली असून, पीडित महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांदेखत घडलेल्या या प्रकारामुळे घुले हत्या प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण मिळाले असून, या संवेदनशील घटनेनंतर पोलीस व जिल्हा प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.