


केज दि. २४ – शहरातील उमरी रोड, अहिल्यादेवी नगर आणि इरिगेशन कार्यालय परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने (लो-व्होल्टेज) वीज पुरवठा होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली असून, परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
दुसरी डीपी बसवूनही समस्या कायम
उमरी रोड आणि अहिल्यादेवी नगर परिसरातील ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वाढत्या भारामुळे इरिगेशन कार्यालयाजवळ नवीन डीपी (ट्रांसफॉर्मर) उभारण्यात आली खरी, परंतु तांत्रिक ढिसाळपणामुळे परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. नवीन डीपी बसवूनही कमी दाबाची समस्या सुटलेली नसून महावितरणचा हा प्रयोग निष्फळ ठरला आहे.
नागरी डीपीवर कृषी पंपांचा भार
या समस्येचे मुख्य कारण म्हणजे शहरातील नागरी वस्तीसाठी असलेल्या डीपीवरूनच शेतातील कृषी पंपांना बेकायदेशीर किंवा अयोग्य पद्धतीने वीज पुरवठा केला जात आहे. कृषी पंपांचा मोठा भार एकाच डीपीवर पडत असल्याने शहरात व्होल्टेज टिकतच नाही. त्यामुळे कृषी पंपांसाठी स्वतंत्र डीपी व लाईन देऊन शहरातील डीपींवरील अतिरिक्त भार तात्काळ कमी करावा, अशी रास्त मागणी नागरिक करत आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
सदरील उमरी रोड आणि अहिल्यादेवी नगर परिसरात नगरपंचायतीची नळ योजना नसल्याने येथील रहिवासी पूर्णपणे बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, अत्यंत कमी व्होल्टेजमुळे बोअरवेलच्या मोटारी आणि घरातील वॉटर फिल्टर, फ्रीज यांसारखी विद्युत उपकरणे सुरूच होत नाहीत. परिणामी, ऐन पावसाळ्यात तुटपुंज्या पाण्यासाठी नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
महावितरणने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कृषी पंपांना वेगळी डीपी बसवावी आणि उमरी रोड भागातील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.