अंबाजोगाईत अनैतिक व्यापारावर पोलिसांचा छापा…..!

अंबाजोगाई दि. ११ – शहरातील सेलू रोड परिसरातील पिताजी सारडा नगरीमधील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यापाराचा अंबाजोगाई शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:२५ वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई केली.
कारवाईदरम्यान घटनास्थळी दोन महिला आढळून आल्या असून, एका ४० वर्षीय पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा परभणी जिल्ह्यातील डेबेवाडी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांचा वापर करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असताना रंगेहात सापडला. कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ५०० रुपयांच्या दोन नोटा (एकूण १,००० रुपये रोख) आणि मॅनफोर्स कंपनीचे निरोधाचे एक पाकीट असा मुद्देमाल जप्त केला आहे. पीडित दोन्ही महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून, आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA) १९५६ मधील कलम ३, ४ आणि ५ अन्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अंबाजोगाई शहर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर व अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.