केज (प्रतिनिधी):
केज शहरातील अत्यंत गजबजलेल्या भवानी चौकात आज दुपारी एक भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. या अपघातात एका ३५ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, केज शहरात बेधुंद वेगाने धावणाऱ्या हायवा आणि अवजड वाहनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय घडली?
प्राप्त माहितीनुसार, नितीन चाटे (वय ३५ वर्षे, रा. तांबवा) हे आज दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या मोटारसायकलवरून भवानी चौकातून जात होते. याच वेळी एका भरधाव अवजड वाहनाने (हायवा) त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, नितीन चाटे हे थेट वाहनाच्या चाकाखाली आले आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चौकात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दी पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, केज येथे हलवण्यात आला आहे.
भवानी चौक ठरतोय ‘अपघात प्रवण स्थळ’
केज शहरातील भवानी चौकात वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याने हा चौक आता ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघात प्रवण स्थळ) बनला आहे.
हायवा चालकांचा हैदोस
शहरातून बेधुंद वेगाने जाणाऱ्या हायवा आणि अवजड वाहनांवर प्रशासनाचे कसलेही नियंत्रण उरलेले नाही. रस्त्यावरून चालणारे पादचारी, लहान वाहने यांचा कसलाही विचार न करता हायवा चालक सुसाट वेगाने चालतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच चौकात वाहतूक पोलीस किंवा वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
भवानी चौकातील वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने त्वरित गतीरोधक बसवावेत, अवजड वाहनांना शहरातून जाण्यासाठी ठरावीक वेळेचे बंधन घालावे आणि भरधाव वाहन चालवणाऱ्या हायवा चालकांसह मालकांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.