
केज दि. १२ – प्रतिनिधी –
राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भेसळयुक्त अन्न आणि अस्वच्छतेच्या विरोधात धडक कारवाई केली जात असताना, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केज शहरात सध्या खाजगी वसतिगृहांचे (Private Hostels) पेव फुटले असून, तेथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यासह शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या खानावळी, बेकरी आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या परवानग्यांवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वसतिगृहे आणि खानावळींवर कुणाचे नियंत्रण?
केज शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. याचाच फायदा घेत अनेक ठिकाणी खाजगी वसतिगृहे सुरू झाली आहेत. या वसतिगृहांना जोडलेल्या खानावळींमध्ये (Mess) विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र, यापैकी किती खानावळींकडे अन्न व औषध प्रशासनाचा अधिकृत परवाना आहे आणि तिथे स्वच्छतेचे निकष पाळले जातात का, याची तपासणी गेल्या अनेक महिन्यांपासून झालेली नाही. निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते आणि नियमावलीचा अभाव
शहराच्या मुख्य बाजारपेठेत, बसस्थानक परिसरात आणि शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर भेळ, वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांचे गाडे लागलेले असतात. शहराच्या मुख्य रस्त्यावर चिकन विक्री उघड्यावर होत आहे. तिथे कसल्याच प्रकारची स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. उघड्यावर विक्री होणारे हे पदार्थ, त्यावर बसणाऱ्या माश्या आणि वापरले जाणारे निकृष्ट दर्जाचे तेल यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विक्रेत्यांकडे अन्न सुरक्षा परवाना आहे का, याची साधी चौकशीही प्रशासनाकडून केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
जार मधील पाणी फक्त थंड, शुद्धतेचे तीन तेरा…. “
शहरात मोठ्या प्रमाणावर जार चे पाणी देणारे वॉटर प्लांट थाटलेले आहेत. छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी लोक पाणी मागवतात. मात्र जार मधील पाणी केवळ थंड केलेले असते. एवढेच नव्हे तर जिथे प्लांट आहेत तेथील जागा अतिशय अस्वछ दिसून येते. मात्र कुणाचीच भीती नसल्यामुळे ते बिनधास्त आरोग्याशी खेळत आहेत. इकडे पण थोडेसे लक्ष देण्याची गरज आहे.
प्रशासकीय उदासीनतेचा फटका
राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कारवाया होत असल्याच्या बातम्या समोर येत असताना, केज तालुक्यातील स्थानिक प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणत्याही ठोस कारवाईचा पत्ता नसल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
“केज शहरात मोठ्या प्रमाणावर खाद्यान्न व्यवसाय विनापरवाना सुरू आहेत. प्रशासनाने तातडीने या वसतिगृहांच्या खानावळी आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करावी. आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.”
– स्थानिक नागरिक
आता अन्न व औषध प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, की पुन्हा एकदा तक्रारींकडे दुर्लक्ष करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.