या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार बाळाराम पाटील यांनी भूषवले, तर शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा अलिबागच्या नगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १० मान्यवरांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी पीएसआय स्वरूपा सुंदर नाईकवाडे हिचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्वरूपा नाईकवाडे हिने जिद्द व चिकाटीच्या बळावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले स्थान निर्माण केले आहे. एवढेच नव्हे तर नक्षलग्रस्त भागात तिने आपले कर्तव्य अगदी धाडसाने बजावले आहे. स्वरूपा ही पत्रकार सुंदर नाईकवाडे यांची कन्या असून माता पित्याच्या उपस्थितीत तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी कॉ. राजू देसले, संपादक गंमत भंडारी, ह.भ.प. अविनाश भारती, भाई संपत पवार, प्रा. डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे, शाहीर तुकाराम ठोंबरे, अनिता कांबळे आणि कॉ. बळवंत कदम या १० गुणवंतांना ‘क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, पुरस्कारामुळे सामाजिक कामात अधिक ऊर्जा व बळ मिळते, अशी भावना सत्कारमूर्तींनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले तर सन्मानपत्राचे वाचन माजी सैनिक जनार्धन सोनवणे यांनी केले.